‘…तर अजित पवार पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करतो, अशी बदनामी झाली असती’ – उपमुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “मी लोणीकंदला पंप टाकला, त्या काळात मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ व्हायची. मग माझ्या नावावर पंप आहे, म्हटल्यावर अजित पवारचं भेसळ करतोय, अशी माझी बदनामी व्हायची. त्यामुळे तो पेट्रोल पंप मी बांदलांना चालवायला दिला. साखर कारखान्यांमधील पेट्रोल पंप कारखान्यामार्फत चालवतो.” पुण्यातील खेड तालुक्यात खासगी पेट्रोलपपंच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे बदनामी होते. त्यामुळे पंप चालवायला घाबरत होतो, अशी कबुली दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ही बदनामी टाळण्यासाठीच लोणीकंद येथील पंप दुसऱ्यांना चालवायला दिला होता, असा खुलासाही अजित पवारांनी केला आहे. दरम्यान, ज्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं त्या नव्या पंपावर, असं काहीही घडणार नाही, अशी अपेक्षाही यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली आहे. “एकदा का जनतेला समजलं की, या पंपावर गडबड करून लूट केली जाते, मग तो पंप ओस पडलाच म्हणून समजा.” असं सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी यावेळी केलं. अजित पवारांना या विधानातून नेमकं काय सुचवायचं होतं, तसेच त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता, असा चर्चाही यावेळी उपस्थितांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी बोलताना पुढे पवार म्हणाले, “बारामतीमध्ये खरेदी-विक्री संघ, दूध संघ आणि मार्केट कमिटीचे असे अनेक पंप चालवले जातात. या ठिकाणी कोणतीही भेसळ होणार नाही, असा विश्वास तिथं मोठ्या संख्येने येणाऱ्या ग्राहकांना असतो. पण आता भेसळीचे प्रमाण जवळपास संपुष्टात आलंय. पेट्रोल-डिझेलचे टँकर जिथून भरून निघतात तिथपासून ते पंपावर येईपर्यंत प्रत्येक मिनिटाला अगदी बारकाईने लक्ष ठेवले जाते. या टेक्नॉलॉजीमुळं भेसळ बंद झालीये, पण काही पंपांवर आता चिप बदलली जाते. त्यातून पेट्रोल-डिझेलची चोरी केली जाते. पण असले धंदे फार काळ टिकत नाहीत.”