…म्हणून अजितदादांनी बारामतीमधील 14 दिवसांचा जनता कर्फ्यू 7 दिवसांवर आणला !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीत गेल्या 3-4 दिवसात कोरोनाचा कहर झाला आहे. शहर व तालुक्यात जवळपास 400 रुग्ण सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यासाठी आपल्याला विश्वासात घेतलं नाही असं सांगत व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. यानंतर आता 14 दिवसांचा कर्फ्यु हा 7 दिवसांवर आणला आहे.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितलं की, सांगितलं की, जर रुग्णांची संख्या कमी झाली तर कर्फ्यु कमी केला जाईल. मात्र रुग्णसंख्या वाढली तर 14 दिवसांचा कर्फ्यु पुढे सुरूच राहिल.

शुक्रवारी (दि 4) बारामती नगरपालिका प्रशासनाकडून 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर (14 दिवस) या कालावधीसाठी जनता कर्फ्यु लागू होणार असल्याचं जाहीर केलं होतं. अनेक लोकांच्या बंद बाबतीत मागणी स्वरूपाच्या सूचना आल्यामुळं हा बंद घेण्यात आल्याचं तावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं की, आधीच व्यापाऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. त्यात पुन्हा 14 दिवस लॉकडाऊन हा निर्णय न परवडणारा होता. याबाबत व्यापारी महासंघाला विश्वासात घेतलं नसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. यानंतर निर्णय बदलण्यात आल्याचं गुजराथी यांनी सांगितलं.