सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केलं ‘शपथ’पत्र

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केले आहे. यात त्यांच्यावरील सर्व प्रकरणे मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्या प्रकरणी सीबीआय चौकशी मागणी अतुल जगताप यांनी केली आहे. तर जनमंच या संस्थेने या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन आयोगाकडे सोपविण्याची विनंती हायकोर्टाला केली आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी हे शपथपत्र दाखल करुन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या शपथपत्रात अजित पवार यांनी सांगितले की, जलसिंचन खात्याचा मंत्री म्हणून काम करताना आपण सर्व नियमांना धरुनच निर्णय घेतले. कोणत्याही एफआयआरमध्ये आपले नाव नाही. तसेच चौकशी आयोगानेही आपल्यावर आरोप केलेला नाही. त्यामुळे सर्व प्रकरणे मागे घेण्याची त्यांनी विनंती केली आहे.
काही दिवसांपूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना क्लीन चीट दिली होती. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खाते होते. या खात्यात ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला होता. तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये मुख्यमंत्री व राज्यपाल यांना अहवाल सादर केला. त्यात सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/