औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादच्या नामांतरावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नामांतराच्या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघीडीत (Mahavikas Aghidi) विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासून मुख्य अजेंडा आहे. तर शहरांची नावं बदलून विकास होत नसल्याचे सांगत काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू, असे अजित पवारांनी सांगितले.

सर्व पहिल्यासारखं सुरळीत होईल

पहिल्यांदा महाराष्ट्र आणि भारत कोरोनामुक्त व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. हे झाल्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वीप्रमाणे होईल. यावेळी फिजिकल डिस्टंसिंग ठेवावं लागणार नाही तसंच मास्कही लावण्याची गरज पडणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.