मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अनेक बड्या अधिकार्‍यांविरुद्ध अ‍ॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल; गुन्ह्यात विविध कलमांचा समावेश, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन  – मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह अनेक पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमवीर सिंग यांनी हजारो कोटींचा भष्ट्राचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली होती. त्याबरोबरच परमवीर सिंग यांच्यासह काही बड्या पोलीस अधिकार्‍यांनी घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन पोलिसांनी परमवीर सिंग यांच्यासह अनेक अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार ठाणे शहरात घडला असल्याने अकोला पोलिसांनी हा गुन्हा ठाणे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, सहायक पोलीस आयुक्त विजय फुलकर, व्हि बी कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, लक्ष्मण तांबे, शैलेंद्र नगरकर, सहायक पोलीस निरीक्षक ए पी. जम्बुरे, मरवडे, पवार, पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, बापू गंगाधर रोहोम, पोलीस नाईक बाप्पु तायडे, मदन शरद दराडे, शरद पानसरे, भगवान ऊर्फ संदीप कुंडाजी कासार, निलेश अर्जुन हांडे, धनराज गोलाराम चौधरी, सचिन महादेव राऊत, भरत बबन सातपुते, विपुल नारायण सुर्वे, उमेश हरीअन्ना शेट्टी, हरीशकुमार धिरेंद्र ठक्कर, मंगेश शरद कुलकर्णी, संतोष पंडीत पाटील, नंदु सर्जेराव फर्डे, श्रीपती रचना माहर, सुयोग श्रीधर पाटील, एम के सोनवणे, गोदुमल नारायणदास किशनानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक पोलीस अधिकार्‍यांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये त्यांच्याविरुद्ध हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.