अक्षय कुमारला भेटण्यासाठी गेलेला ‘तो’ चाहता गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यात घुसणे एका चाहत्याला चांगलेच भोवले आहे. अक्षय कुमारला भेटण्यासाठी गेलेल्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर चाहत्याने अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. जुहू पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायलयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.

अंकित गोस्वामी असं या चाहत्याचं नाव आहे. अंकित गोस्वामी खिलाडी अक्षय कुमारचा चाहता असून त्याचा भुवनेश्वर येथे दुधाचा धंदा आहे. त्याला अक्षय कुमारला भेटण्याची खूप इच्छा होती. त्याला ती चांगली अंगलटही आली. अक्षय कुमारला भेटण्यासाठी अंकित भुवनेश्वर येथून मुंबईत आला होता. अक्षय कुमारच्या जुहू येथील बंगल्याचा पत्ता त्याने गुगल मॅपवरून मिळवला यानंतर त्या पत्त्यावर पोहोचला.

अक्षय भेटण्याच्या त्याच्या इच्छेला तो कंट्रोल करू शकला नाही. अक्षय कुमारला भेटण्यासाठी अंकित कोणत्याही परवानगीविना बंगल्यात शिरला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अंकितला अडवले. यानंतर अंकित आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. काही केल्या वाद मिटेना हे पाहून यामध्ये मुंबई पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली. परंतु इरेला पेटलेल्या अंकितने त्यांच्याशीदेखील हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर मात्र जुहू पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केले. यानंतर त्याला न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.