मद्यतस्करी करणाऱ्यास उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – चोरट्या मार्गाने दारुची तस्करी करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून कारसह दारुचे तब्बल ३० बॉक्स जप्त करण्यात आले. ही कारवाई आज (शनिवार) सेलूदफाटा ते लाडसवंगी चौका दरम्यान करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरटी दारू पकडण्यात आल्याने मद्यतस्करामध्ये खळबळ उडाली. शंभाजी दामू हिवराळे असे अटक करण्यात आलेल्या मद्य तस्कराचे नाव आहे.

याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षक के. पी. जाधव यांनी सांगितले की, औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील विविध गावांत चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्यांना आरोपी हा देशी दारू ठोक दरांत विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हिवराळे याच्यावर पाळत ठेवून होते.

आज तो मद्य तस्करांना दारु विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून शंभाजी हिवराळे याला अटक केली. ही कारवाई उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.पी. जाधव, कर्मचारी एस.एम.खरात,वाहनचालक भगवान बडक यांनी केली.