#SurgicalStrike2 : मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. भारताने केलेल्या या हल्ल्यात ३५० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरला आहे.  या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील किनाऱ्या लगतच्या भागांना सतर्क रहाण्याचे सांगण्यात आले आहे.

याआधी अनेकदा मुंबईला लक्ष करण्यात आले आहे. १९९३ सालच्या स्फोटापासून मुंबई दहशतवादाच्या झळा सोसत आहे. आज भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनतर मुंबईवरचा धोका वाढला असला तरी मुंबईकर मात्र डगमगलेले नाहीत ना घाबरले आहेत , अशी प्रतिक्रिया मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे.

भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ नेस्तनाबूत केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड हालचालींना वेग आला आहे. आम्हाला पण या हल्ल्याचा प्रतिकार आणि स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे, असे मत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. त्यांच्याकडून लष्कर आणि सुरक्षा संबंधी राजधानी इस्लामाबाद येथे तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.

पूंछमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार
जम्मू-काश्मीरमधील पूंछ विभागातील नौशेरा, बालाकोट, मनकोट फॅक्टर याठिकाणी  पाकिस्तानी सैन्य जोरदार गोळीबार करत आहेत. भारतीय जवानांकडून  या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.