भारतापेक्षा पाकिस्तानात जास्त सुखी राहिन, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या द्वेषाचे वातावरण आहे. त्यामुळे मला बऱ्याचदा असे वाटते की मी इथल्यापेक्षा पाकिस्तानात जास्त आनंदी राहिन, असे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची आई सोनी राझदान यांनी एका हिंदी वृत्तपत्राच्या मुलाखतीत केले आहे. सोनी राझदान यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सोनी राझदान यांनी मुलाखतीमध्ये भारतातील सद्य परिस्थितीवर टीका केली आहे. सध्या आपला देश हिंदू राष्ट्र बनण्याच्या दिशेने कूच करत आहे. भारताच्या सांस्कृतिक ढाचा बिघडत चालला आहे. देशात द्वेष पसरत आहे. या द्वेषाच्या वातावरणाविषयी मी काही बोलले की लोक मला देशद्रोही म्हणतात. पाकिस्तानात निघून जा सांगतात, कधी कधी वाटत मी इथल्या पेक्षा पाकिस्तानात जास्त सुखी राहिन. तिथले जेवणही चांगले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांना देशद्रोही देखील ठरवले आहे.