डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि तपासाचा संपूर्ण लेखाजोखा

पुणे : एनपी न्यूज नेटवर्क

तो दिवस होता, २० आॅगस्ट २०१३ आणि वेळ होती सकाळी साडेसात वाजण्याची. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे ज्येष्ठ लेखक रा. ग. जाधव यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानातून मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन ते शनवारातील निवासस्थानाकडे परत येत होते. ते पुलाच्या मध्यभागी आले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्याच्याकडील पिस्तुलातून लागोपाठ ४ गोळ्या झाडल्या. डॉ. दाभोलकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याचवेळी काही अंतरावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. जवळच पुलाच्या शेजारी पोलीस चौकी आहे. पण ती बंद होती. नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना या गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. काही वेळाने पुलावर गोळीबारातून एकाची हत्या झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर त्यांच्यातील एकाला ते डॉ. दाभोलकर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने सुन्न झाला.

पोलिसांना या हत्येचे गांभीर्य लक्षात येईपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. हल्लेखोरांविषयी माहिती देणाऱ्यास शासनाने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पुणे पोलिसांनीही १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

[amazon_link asins=’B01MU2AVOR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4854a31b-a369-11e8-818c-3b9e97236693′]

या हत्येचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी २३ तपास पथकांची स्थापना केली. हल्लेखोर हे जवळपास पाऊण तास घटनास्थळावर असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्हीचे मिळालेले चित्रण अस्पष्ट होते. ही घटना समोरच्या बंगल्यातील एका व्यक्तीचे पाहिल्याचे समोर आले. त्याने केलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी हल्लेखोरांपैकी एकाचे रेखाचित्र जारी केले.

डॉ. दाभोलकर यांनी ज्यांच्या ज्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यांच्यापैकी एखाद्याचे हे कृत्य असावे यादृष्टीने तपासाला सुरुवात झाली. त्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची मदतही घेण्यात आली.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्याला भेट देऊन हत्येच्या तपासाची माहिती घेतली. राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांकडेही चौकशी सुरु करण्यात आली. त्याचवेळी या हत्येमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्य शासन आणि गृह मंत्रालयाला पुण्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यानेच ही हत्या झाल्याचा आरोप केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पुण्यातून बांगड्यांचा आहेर पाठविण्यात आला. मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोलकरांच्या हत्यामागील सुत्रधार सापडणे आवश्यक असल्याचे पोलिसांना सांगितले.

दुसरीकडे शहरातील ज्योतिषी, खडेवाले यांच्याकडे चौकशी केली जाऊ लागली. शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज एकत्र करण्यात आले. पंरतु, अनेक ठिकाणी दुकानदार दुकान बंद करताना रस्त्यावरील सीसीटीव्ही बंद करीत असल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दहशतवाद विरोधी पथकानेही या हत्येचा समांतर तपास सुरु केला.

त्यानंतर २८ आॅगस्ट रोजी डॉ. हमीद व मुक्ता दाभोलकर यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन हल्लेखोर पकडत नाही तोपर्यंत समाधानी नसल्याचे सांगितले. याचदिवशी पुण्यात निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हत्येच्या सुत्रधाराला पकडण्याची मागणी करण्यात आली.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे सतानत तसेच हिंदुत्ववादी संघटना असल्याचा संशय पहिल्या दिवसांपासून व्यक्त केला जात होता. त्यातच गोव्यातील सनातन आश्रमातून एका तरुणाला पकडण्यात आल्याचे वृत्त बाहेर आले. पण, त्याच्याकडे चौकशी करुन त्याला काही तासात सोडून देण्यात आले.

पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने अधिक तपासासाठी ते लंडनला पाठविण्यात आले. पॅरोलवर बाहेर असलेल्या १२ गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली.

त्यादरम्यान, ३० आॅगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र आल्याने पुन्हा एकच खळबळ उडाली. सोशल मिडियावर दाभोलकर यांच्या फोटोवर फुटी मारल्याचे चित्र व्हायरल झाले.

[amazon_link asins=’B00BON6XX0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57d6365b-a369-11e8-970f-8f21b9c9892b’]

१ सप्टेंबर रोजी पोलिसांना सात सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी दिसल्याचे स्पष्ट झाले. परंतु ते अगदीच अस्पष्ट होते. पुणे पोलिसांनी हत्येच्या घटनेच्यापुर्वीचे आणि हत्येच्या नंतरचे असे एकूण १२० सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. त्यातील सात फुटेजमध्ये मरेकऱ्यांची छबी टिपली गेली होती. २० आॅगस्ट रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मारेकरी हे त्यांच्या दुचाकीवरुन शिंदे पाराकडून आल्याचे दिसत होते. त्यानंतर आरोपी शनिवार पेठ, नदीपात्र, शनिवार वाड्याची पश्चिम बाजु, पुन्हा शिंदे पार अशा भागांमधून फिरुन पुन्हा घटनास्थळाजवळ आल्याचे दिसत होते. हत्येपुर्वी हल्लेखोर अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ घटनास्थळाजवळच्या परीसरात फिरत होते.

पुणे पोलिसांनी परराज्यातील पोलिसांचीही मदत या तपासासाठी घेतली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराबरोबरच आणखी दोन साक्षीदार पोलिसांना मिळाले. त्यांनी केलेल्या वर्णनावरुन दुसऱ्या मारेकऱ्याचे रेखाचित्र जारी करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अंनिस) दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली. एकाच शस्त्रातून चार गोळ्या झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्याचवेळी प्रत्यक्षदर्शीने मोटारसायकलचा रंग व नंबर प्लेटसवरील काही नंबरवरुन त्याच्याशी साधम्य असणाऱ्या शेकडो मोटारसायकलची व त्याच्या मालकांची चौकशी केली. घटना घडली तेव्हा ते कोठे होते, याची माहिती घेतली पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गरज भासल्यास सीबीआयकडे तपास सोपविणार असल्याचे ५ सप्टेंबरला कोल्हापूर येथे सांगितले. गणेशोत्सवात राज्यातील अनेक गणेश मंडळांनी अंधश्रद्धा निर्मुलन जागृतीचे देखावे सादर करुन डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहिली.

रेखाचित्राशी साम्य असलेल्या १७ गुन्हेगारांकडे पोलिसांनी चौकशी केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ८ कोटी फोन कॉल्सचा डाटा जमा केला. पण, त्यातून काहीही हाती लागू शकले नाही. ज्या दिवशी डॉ. नरेद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्याच दिवशी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल या दोघांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. दोघेही बेकायदेशीर शस्त्रविक्री करत असतात. त्यातूनच त्यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी त्यांना पुणे विद्यापीठात झालेल्या रखवालदारच्या खुन प्रकरणी अटक दाखविले. प्रत्यक्षात त्यांच्याकडे दाभोलकर यांना मारण्यासाठी कोणाला शस्त्रे विकली याचा तपास करायचा होता. दाभोलकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या या ७.६५ पिस्टनमधून झाडण्यात आल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला होता. त्याआधारे नागोरी व खंडेलवाल यांच्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलातूनच गोळ्या झाडण्यात आल्याचा अहवाल मिळाल्यावर पोलिसांनी दोघांना दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली.

[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6498a93c-a369-11e8-bfad-bd793a3b5ef1′]

मात्र, ही शस्त्रे त्यांनी कोणाला विकली. ते मारेकरी कोण याचा तपास पोलीस लावू शकले नाहीत. परिणामी न्यायालयाने काही दिवसांनी दोघांचीही जामीनावर मुक्तता केली. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांबरोबरच ज्योतिषी, भोंदुबाबा आणि राशी खडेवाल्यांची चौकशी करण्यात येत होती. त्याच वेळी तपासासाठी ज्योतिषांची मदत घेतली जात असल्याचे पुढे आले. अंधश्रद्धा विरोधात आयुष्य वेचलेल्या डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ज्योतिषांची मदत घेतली जात असल्याच्या वृत्ताने एकच संताप व्यक्त केला जाऊ लागला. त्याच सुमारास ज्येष्ठ पत्रकार आशिष खेतान यांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पोलिसांनी दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट केल्याचे उघड झाले. त्यासाठी निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मदत घेतल्याचे उघड झाले. खेतान यांनी यावर आऊटलुक मध्ये लेख लिहिला. त्यांच्यावर गुलाबराव पोळ यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले व कायदेशीर नोटीस पाठविली. पंरतु, खेतान यांनी प्लँचेट करतानाचा ठाकूर याचा व्हिडिओच प्रसिद्धीला दिल्याने पोळ यांनी पुढे गप्प बसणे पसंत केले होते.

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली. न्यायालयाने याचा तपास सीबीआय कडे सोपविण्याचा आदेश दिला. त्यानंतर काही दिवसांनी कोल्हापूर येथील एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीवरुन सीबीआयने पनवेल येथील सनातन आश्रम आणि डॉ. विरेंद्रसिंह तावडे याच्या घरावर छापा टाकला. त्या आश्रमातून हार्ड डिक्स जप्त केली. तसेच सारंग अकोलकर याच्या पुण्यातील शनिवार पेठेतील घरावर छापा टाकून काही कागदपत्रे हस्तगत केली. त्यानंतर वीरेंद्रसिंह तावडे याला सीबीआयने १० जून २०१६ ला तावडे याला अटक केली होती.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सहा जणांची नावे निष्पन्न झाली असून हत्येपूर्वी तीन महिने अगोदर वीरेंद्र तावडेला दाभोलकरांवर फोकस करा असा ई मेल आला होता. त्याला त्याने उत्तर न देता त्याची अंमलबजावणी केल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला होता. तावडे याच्या घराची झडती घेतली. त्यात एक यादी मिळाली असून त्यात हिंदूविरोधी लोकांची नावे असून त्यांना त्यांनी दानव, राक्षस असे म्हटले आहे. याशिवाय अकोलकर आणि तावडे यांच्यातील ई मेलमध्ये कोड शब्दांचा वापर केला असून काडतुसांना त्यांनी चॉकलेट म्हटले होते. अन्य कोड शब्दांचा त्याच्याकडून अर्थ जाणून घ्यायचा आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी एकाच प्रकारच्या शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे बॅलेस्टिक रिर्पोटमध्ये दिसून आले. त्यांना १५ हजार जणांची सेना उभारायची आहे. त्यासाठी सांगलीतील जत, गोव्यातील फोंडा येथे २००९ मध्ये शस्त्रात्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात तावडे सहभागी नसला तरी ज्यांनी ही शिबीरे आयोजित केली होती. त्याच्या संपर्कात तावडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तावडे यांनी ही शस्त्रात्रे कोठून खरेदी केली. त्यासाठी पैसा कोणी पुरविला. या हत्येमागे ६ जणांची नावे निष्पन्न झाली असून गोवा बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्यांचा या हत्येत सहभाग होता का याचा तपास करायचा आहे, त्यावेळी सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. वीरेंद्रसिंह तावडे याची पोलीस कोठडीत चौकशी करुनही नेमके मारेकरी कोण हे सीबीआयला शोधता आले नाही. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी केली. यथा अवकाश सीबीआयने तावडे विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

सनातन संस्थेचा साधक विरेंद्रसिंह तावडे याने कट रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. त्यासंबंधितचा कागदोपत्री व तोंडी पुरावा असल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवेपाटील यांच्या न्यायालयात सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. आर. सिंह यांनी विरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने दाखल केलेल्या २४ पानी आरोपपत्रात केलेल्या तपासात निष्पन्न झालेल्या बाबींचा गोषवारा देण्यात आला. कट रचणे आणि हत्या करणे असे आरोप विरेंद्रसिंह तावडे याच्यावर त्यात ठेवण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे हिंदू धर्माविरुद्ध बोलतात. हिंदू धर्मातील रुढी, परंपरा यांच्याविरुद्ध मोहीम चालवितात. अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात. संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुदगार काढतात. चमत्काराला आव्हान देतात. त्यांची हत्या करण्यामागे हा उद्देश असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.

विरेंद्र तावडे याने मुंबईतून एमबीबीएस केले असून २००१ पर्यंत कोल्हापूर येथे तो प्रॅक्टिस करीत होता. सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयवंत आठवले यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन १९९८ मध्ये तो सनातन संस्थेच्या संपर्कात आला. कोल्हापूरात त्याने भाषणे देण्यास सुरुवात केली. २००१ मध्ये त्याने डॉक्टरकी करणे थांबविले. २००३ ला तो सनातन संस्थेचा समन्वयक म्हणून काम पाहू लागला. हिंदू जनजागृती समितीशी त्याचा संपर्क झाला. अंधश्रद्धा निर्मुलन बिल २००५ याबाबत डॉ. दाभोलकर यांची कोल्हापूरमधील एक बैठकही त्याने इतरांच्या सहकार्याने उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याविरोधात २००४ मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात मोर्चा काढण्यात आला होता. त्याला विरोध करण्यासाठी तावडे याने विरोधी मोर्चा काढला होता. त्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान कोल्हापूर ख्रिश्चन फादर विजय फिली यांनी हिंदू महिलेचे धर्मपरिवर्तन केले होते. या महिलेला पंचगंगेवर नेऊन तिला प्रार्थना करायला सांगितली होती. तेव्हा तावडे याने तेथे जाऊन विरोध केला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. २००६ पर्यंत तावडे हा वेगवेगळ्या मार्गाने कारवाई करीत होता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर हत्या झाली. त्यावेळी त्या परिसरात साफसफाईचे काम करणारे ६ साक्षीदार तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला व काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोघे जण जाताना पाहिल्याचे सांगितले होते. दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्व्हरचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविण्यात आला असून तो आल्यानंतर तपास करायचा आहे. तसेच फरार आरोपी व तावडे याच्या मोटारसायकलीचा तपास करायचा असल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.

या आरोपपत्रासमवेत २० टिपणे सादर करण्यात आली होती. त्यात आतापर्यंत घेतलेल्या विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, विरेंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे यांचा समावेश आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेने मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक केली होती. ते सध्या जामीनावर असल्याचे या आरोपपत्रात म्हटले होते.

या आरोपपत्रानंतर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती मिळावी म्हणून त्यांची छायाचित्रे असलेली पत्रके राज्यभर प्रसिद्धीस देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही अद्याप त्यांचा शोध लागू शकला नाही़ काही दिवसांपूर्वी तावडे याने जामिनासाठी अर्ज केला होता. पण, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता़ सध्या सीबीआयच्या आघाडीवर डॉ दाभोलकर यांच्या प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात पडला होता. कारण, आतापर्यंत त्यांनी शक्य त्या सर्व अंगाने तपास करुनही नेमके मारेकरी कोण याचा छडा ते लावू शकले नव्हते. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना कर्नाटक पोलिसांनी पकडल्यानंतर उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सीबीआयला फटकारताना गौरी लंकेशच्या गुन्ह्यातील आरोपी मिळतात, मग या डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी का सापडत नाही असे विचारले होत.

त्यानंतर आता एटीएसने केलेल्या कारवाईत प्रथमच डॉ. दाभोलकर यांचा मारेकरी सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.