UP : 2 मशिदींवरील ‘स्पीकर’बंदी हायकोर्टाकडून कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिल्हा प्रशासनानं उत्तरप्रदेशातील जौनपूर मधील दोन मशिदींवर ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी घातली होती. दरम्यान ही बंदी उठवण्यात यावी यासाठी मागणी करण्यात आली होती, परंतु हायकोर्टानं ही बंदी उठवण्यास नकार दिला आहे. दोन समाजामध्ये वाद निर्माण होतील अशा उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे यात कुठलाही हस्तक्षेप करण्याचा नकार हायकोर्टानं दिला. जर असं केलं तर सामाजिक सलोखा बिघडू शकतो असं देखील कोर्टानं सांगितलं.

जिल्हा प्रशासनानं आदेश दिले होते की कोणत्याही धार्मिक स्थळी ध्वनिक्षेपक लावू नये. दोन समाजांमधील वाद थांबवण्यासाठी हा महत्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला होता. दरम्यान ही बंदी उठवण्यात यावी अशी विनंती जौनपूरच्या बद्दोपूरमधील रहिवासी मशरूर अहमद आणि मुस्लीम समाजातील अन्य नागरिकांनी केली होती. मात्र अलाहाबाद कोर्टानं ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

मंदिर आणि मशिदीमध्ये ध्वनिक्षेपक लावण्यासंबंधीच्या जनहित याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठानं उत्तर प्रदेशचे गृहसचिव, मुख्य सचिव आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रमुखांना नोटीस बजावली होती. त्यानंतर राज्यसरकार कडून सार्वजनिक ठिकाणं, धार्मिक स्थळं, मिरवणुका, सभा, सोहळ्यांमध्ये विनापरवानगी ध्वनिक्षेपक वाजवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांनी मशिदींमध्ये रोज पाच वेळा दोन मिनिटांसाठी या उपकरणांचा वापर करू द्यावा अशी विनंती केली होती. त्यांनी या याचिकेत नमूद केले होते की, हा आमचा धार्मिक कार्याचा भाग असून यामुळे प्रदूषण होण्याचा धोका आणि शांतता भंग होणार नाही. सध्या वस्ती वाढल्याने ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना नमाजासाठी बोलवावं लागतं त्यामुळे ध्वनिक्षेपक हे गरजेचं आहे असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र यामुळं सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळं ही बंदी उठवण्यास नकार देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –