राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांच्या सुनेनं मौन सोडलं, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात त्यांची सून गौरी हिने छळाची तक्रार दिली होती त्यानंतर विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांची सून गौरी हिने ‘माझे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप साफ खोटा आहे. चव्हाण कुटुंबीयांनी आधीच माझी बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यानुसारच हे सगळे आरोप होत आहेत,’ असे म्हंटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विद्या चव्हाण यांची सून गौरी हिने आपली बाजू मांडली आहे. याबाबत बोलताना गौरी म्हणाल्या,” ‘घरात छळ होत असल्यामुळं मी पोलिसांकडं तक्रार केली, तेव्हाच माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करून बदनामीची धमकी चव्हाण कुटुंबानं दिली होती. त्यानुसार आता सगळं केलं जात आहे. मला मुलगा झाला नाही म्हणून माझा छळ व्हायचा. माझ्या दीरानंही माझा मानसिक छळ केला. मात्र, मी गप्प बसणार नाही हे लक्षात येताच त्यांनी मला घराबाहेर काढलं. माझ्या लहान मुलीला माझ्यापासून वेगळं केलं. मी तिला भेटायला गेले तेव्हा माझ्यासह माझ्या वडिलांना त्यांनी धक्के मारून बाहेर काढलं,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या महिलेनंच माझ्यावर अन्याय केला

यावेळी पुढे बोलताना गौरी म्हणाल्या, १६ जानेवारी रोजी मी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी डीवी केस दाखल केली. मी केलेले आरोप मागे घेण्यासाठी ते माझ्याच मुलीचा वापर करीत आहे. मला मुलीला भेटू दिलं जात नाही. सध्या कौटुंबिक न्यायालयानं १ ते ६ या वेळात मला मुलीला भेटण्याची परवानगी दिली आहे. पण मला मुलीशी फोनवरही बोलू दिलं जात नाही. महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या महिलेनंच माझ्यावर असा अन्य़ाय केलाय, अशी खंतही तिनं बोलून दाखवली.

विद्या चव्हाण यांचा आरोप

‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या इतर कुटुंबियांवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे विद्या चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.