खुशखबर ! ‘या’ शहरांमध्ये Amazon India तब्बल 20000 लोकांना देणार नोकर्‍या, जाणून घ्या योग्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाने रविवारी म्हटले की, ते सुमारे 20,000 तात्पुरते कर्मचारी नियुक्त करतील. अ‍ॅमेझॉन इंडिया ही नियुक्ती आपल्या ग्राहक सेवा विभागात करेल जेणेकरुन भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा अंदाज आहे की, येत्या 6 महिन्यांत ग्राहकांची रहदारी वेगाने वाढेल, त्यासाठी आगाऊ आवश्यक ती तयारी करावी लागेल. अ‍ॅमेझॉन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद, पुणे, कोयंबटूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगलोर, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ येथे या नोकर्‍या उपलब्ध आहेत. यापैकी बहुतेक पोस्ट्स अ‍ॅमेझॉनच्या ‘व्हर्च्युअल ग्राहक सेवा प्रोग्राम’ अंतर्गत असतील, ज्यात घरातून काम करण्याची सुविधा मिळते.

काय आहे योग्यता
या पदांवर नियुक्त केलेल्या व्यक्तीचे काम असोसिएट सपोर्ट कस्टमर सर्व्हिसचे असेल. जे ई-मेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोनद्वारे ग्राहकांना मदत करतात. या पदांसाठी किमान पात्रता बारावी पास आहे. तसेच अर्जदाराला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू किंवा कन्नड भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

कायमस्वरूपी पोस्टिंगची संधी
अ‍ॅमेझॉन इंडियाने असेही म्हटले आहे की, ही तात्पुरती पोस्ट उमेदवारांच्या कामगिरीवर आणि व्यवसायाच्या गरजेनुसार कायमस्वरुपी पोस्टमध्ये रुपांतरित केली जाऊ शकतात. या विषयी कोणताही निर्णय या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येईल. अ‍ॅमेझॉन इंडियाचे संचालक (ग्राहक सेवा) अक्षय प्रभू म्हणाले, ग्राहक सेवेच्या क्षेत्रात आम्ही सतत नवीन हायरिंग गरजांचे मूल्यांकन करीत आहोत. हा निर्णय ग्राहकांच्या वाढत्या मागणीच्या आधारे घेतला जात आहे. येत्या 6 महिन्यांत ग्राहकांची मागणी वाढणार असल्याचा आमचा अंदाज आहे कारण भारत आणि इतर देशांमध्ये सुट्टीचा हंगाम सुरू होणार आहे. सध्याच्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नवीन भरतीमध्ये नोकरीची पूर्ण सुरक्षा आणि रोजगाराची सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

5 वर्षात 10 लाख लोकांना नोकरी देण्याची योजना
अ‍ॅमेझॉनने घोषित केले होते की, 2025 पर्यंत ते तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये गुंतवणूक करेल, जेणेकरुन एकूण 10 लाख नवीन लोकांना रोजगार मिळेल. याअंतर्गत, लोकांना विविध उद्योगांच्या आधारे थेट आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळू शकतील, ज्यात माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, सामग्री तयार करणे, किरकोळ, लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंगचा समावेश असेल. गेल्या 7 वर्षातच अ‍ॅमेझॉनकडून भारतात गुंतवणूकीतून 7 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. यावर्षी मे महिन्यात अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या वेअरहाऊसिंग आणि डिलिव्हरी नेटवर्कसाठी 50,000 तात्पुरत्या नोकर्‍या जाहीर केल्या होत्या.