‘ठाकरे’ सरकारच्या शपथविधीच्या दिवशीच ‘राज’पुत्राचा महामोर्चा

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याची जय्यत तयारी देखील झाली असल्याचे दिसते. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबदेखील आता सत्ता उपभोगणार आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदाच मोर्चा काढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या मुहूर्तावरच ठाकरे कुटुंबातीलच राजपुत्राच्या मोर्चाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहे. आणि या मोर्चाचे नेतृत्वदेखील करणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. हा मोर्चा काढण्याचे कारण म्हणजे नवी मुंबईतील कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामकागारांना त्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

हा महामोर्चा नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व अमित ठाकरे करणार असून मोर्चेचे कारण म्हणजे, नवी मुंबई महानगर पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, पाणी पुरवठा, विद्युत, अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी एकूण ९० कोटी रुपये आहे. तसेच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात येणार आहे.

या महामोर्चात शहरातील तीन ते चार हजार कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत. सिवूडस रेल्वे स्टेशन (पश्चिम) ब्रिज पासून महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल. या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. या सभेत अमित ठाकरे कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर बोलणार आहेत. त्यामुळे सध्या ठाकरे कुटुंबातील राजपुत्राच्या मोर्चाची चर्चा सगळीकडे होत आहे.

Visit : Policenama.com