मंत्रालयात मग्न राहिले ‘चाणक्य’ अन् 2 राज्यातील निवडणूकीचं ‘गणित’च बिघडलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले. मात्र त्यानंतर जेपी नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे आता पक्षाची जबाबदारी कोण सांभाळणार अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर अमित शहा यांना काहीकाळ अध्यक्षपदी ठेवण्यात आले. मात्र आता नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या निकालांमधील फरक पाहून आता भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता पक्षाला म्हणावे तसे यश मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे आता अमित शहा यांच्यानंतर कुणाकडे जबाबदारी द्यायची याचा विचार भाजपमध्ये सुरु झाला आहे. त्याचबरोबर जेपी नड्डा यांच्या कार्यशैलीवर आणि कार्यक्षमतेवर देखील प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

महाराष्ट्र आणि हरियाणात पहिल्या क्रमांकावर मात्र म्हणावे तसे यश नाही –

काल झालेल्या मतमोजणीत भाजपने दोन्ही राज्यात यश मिळवले असून महाराष्ट्रात त्यांनी 105 जागांवर यश मिळवले आहे तर हरियाणामध्ये 40 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे मताधिक्य कमी झाले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत म्हणावे तसे यश भाजपला मिळालेले नाही. मागील निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 122 जागा मिळाल्या होत्या तर हरियाणामध्ये 47 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपचा चाणक्य म्हणजे अमित शहा यांची जादू फिकी पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सरकारमध्ये वाढती सक्रियता –

केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात केली असून त्यांनी कलम ३७० सारखा महत्वाचा निर्णय घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर निर्माण झालेले वादळ देखील शांत करण्यात अमित शहा यशस्वी झाले. त्याचबरोबर तिहेरी तलाकसारखा कायदा देखील त्यांनी मंजूर करून घेतला.

उगाच नाही चाणक्य म्हणत –

2014 लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना उत्तरप्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत 80 पैकी 71 जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात अनेक राज्यात भाजपने सरकार मिळवले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाने मोठे यश मिळवले. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने त्यांना अध्यक्षपदासाठी जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे अध्यक्षबदलाचा भाजप विचार करत आहे.

नवीन अध्यक्षासमोर आव्हाने –

कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांना म्हणावे तसे यश मिळालेले नसून महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये भाजपचे मताधिक्य कमी झाले असून त्यांच्यासाठी हि चिंतेची बाब आहे. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षाला नेऊन ठेवलेल्या उंचीवर पुन्हा नेऊन ठेवण्याचे आव्हान नवीन अध्यक्षासमोर असणार आहे.

Visit : Policenama.com