अमित शहांना कोल्‍हापुरात फिरकू देणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २४ जानेवारीला कोल्हापूर दौरा आहे. हा दौरा सुरळीत पार पाडायचा असेल तर शेतकर्‍यांचे प्रश्‍न निकालात काढा, अन्यथा शहा यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे. कृषिपंपाची अन्यायी वीज दरवाढ, थकीत एफआरपीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले आहे.
कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेट्टी म्हणाले की,  ‘सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि त्यानंतर दिलेल्या आश्‍वासनांची आम्ही मोजदादच बंद केली आहे. एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. कोतवालापासून ते सरकारी कर्मचार्‍यांपुढे हे सरकार हतबल होते. मोठ्या संख्येने असलेल्या शेतकर्‍यांकडे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता या सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवण्याची वेळ आली आहे.’
वीज चोर विधानसभेत –
कारखान्यांतून खरेदी करणाऱ्या वीजेचे दर कमी आणि ग्राहकांना वितरित करावयाच्या वीजेचे दर जास्त हा काय प्रकार आहे. अशा कारभारामुळे हे सरकार आहे की दलाल, व्यापारी?’ असा प्रश्न उपस्थित करून खासदार शेट्टी यांनी ‘सरकारकडून कुणाच्या घशात पैसे घालण्याचे उद्योग सुरू आहेत?’ अशी विचारणा केली.  वीज चोरांवर सरकार काही कारवाई करत नाही. उलट विधानसभेत वीज चोरी करणारे बसलेत, असा टोला खा. शेट्टी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता लगावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us