शिवसेना-भाजप युतीला अमित शहांचा हिरवा झेंडा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१९ ला शिवसेना भाजपाबरोबरच असेल, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. २०१९ला भाजपा पुन्हा सत्ता मिळवेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. भाजपाची शिवसेनेबरोबर युती होणार असून, लोकसभा निवडणुकीला आम्ही युती करूनच सामोरे जाऊ, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचा चांगलाच परिणाम भाजपवर झाल्याचे दिसते आहे. आता आगामी निवडणुकांकरिता भाजपाने कंबर कसली आहे. महाराष्ट्राचा विचार  करता  भाजपाला शिवसेने ला निराशा करून चालणार नाही. असा पवित्रा भाजपने घेतला आहे असे वाटते आहे.
शहा मुंबईत दाखल 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबते सुरू आहेत. सत्तेत सहभागी असलेला शिवसेना पक्ष आणि त्यांच्याकडून होत असलेली टीका यावरही अमित शाहांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, भाजपा शिवसेनेच्या टीकेला यापुढे प्रत्युत्तर देणार नसल्याचं भाजपाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
महाआघाडी अस्तित्वात नाहीच : शहांचा टोला 
विरोधकांची महाआघाडी हा एक प्रकारचा भ्रम असून, महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, असा टोलाही अमित शाहांनी लगावला आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकमेकांना साथ देऊ शकत नसल्याचंही अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे. 2019मध्ये भाजपा ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल आणि ओडिशात सत्ता हस्तगत करेल, असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला आहे. 2014मध्ये भाजपाची सहा राज्यांत सत्ता होती, आता 16 राज्यांत सत्ता आहे. त्यामुळे 2019 ची लोकसभा आम्हीच जिंकू, असंही ते म्हणाले आहेत.