Cyclone Amphan : महाचक्रीवादळाने घेतले 12 जणांचे बळी, कोलकतातील सखल भाग पाण्याखाली, चक्रीवादळ ओसरण्यास सुरुवात

कोलकता : वृत्त संस्था – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगालसह ईशान्य भारताला जोरदार तडाखा दिला असून या महाचक्रीवादळ CycloneAmphan ने आतापर्यंत १२ जणांचे बळी गेले आहेत. कोलकत्ताच्या अनेक भागात झाडपडी तसेच सखल भाग पाण्याखाली गेला आहे. चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असून ते ईशान्यकडे सरकले आहे. त्याचे रुपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. वार्‍याचा वेगही गुरुवारी सकाळी ताशी ३० किमी इतका झाला आहे.

या महाचक्रीवादळाने पश्चिम बंगालमधील ६ जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला. कोलकता शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून जागो जागी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. शहराच्या अनेक भागात पाणी तुंबून राहिले आहे.

पश्चिम बंगालमधील दक्षिण, उत्तर २४ परगणा, हावडा या परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड, वीजेचे खांब कोसळणे, रस्ते उद्धवस्त होणे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एनडीआरएफने मदत कार्य सुरु केले आहे. गेल्या ३ दिवसात पश्चिम बंगाल सरकारने ५ लाख सुरक्षितस्थळी हलविल्याने महाचक्रीवादळाला मोठा तडाखा बसूनही त्यामानाने यात जीवित हानी कमी झाली आहे.