प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय तरुणीचा खून, तरुणानं घरात घुसून केले ‘सपासप’ वार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही काळापासून प्रेमप्रकरणातून होणाऱ्या खूनांच्या घटनेत वाढ झाली आहे. अशातच एका 19 वर्षीय तरुणीचा तिच्या घरात घुसून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील लोहेगाव येथे आज दुपारी घडली. आरोपी तरुणाने तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधून घरात घूसला. त्याने धारदार हत्याराने तरुणीच्या गळ्यावर सपासप वार करून तिचा खून केला.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. आरोपी तरुणाने मुलीचा खून केल्यानंतर स्वत:ला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. तरुणाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाल्याने त्याने चाकुने गळा कापून घेतला. त्याला जखमी अवस्थेत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवीण कावनपुरे याचे 19 वर्षीय युवतीवर प्रेम होतं. यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

प्रेम प्रकरणातून प्रवीण आणि मृत मुलीमध्ये वाद होत होते. हे वाद एवढे वाढले की प्रविण याने टोकाचे पाऊल उचलले, अशी परिसरात चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तर जखमी आरोपी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.