अमरावती लोकसभा : इच्छुकांची गर्दी ; शिवसेनेला गड राखण्याचे आव्हान

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ म्हणून अमरावती मतदारसंघ ओळखला जातो. स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाला १९९९ साली शिवसेनेने खिंडार पडले आणि शिवसेनेचे अनंत गुढे लोकसभेत निवडून गेले. तेव्हा पासून आज तागायत या मतदारसंघात शिवसेनेने आपला गड शाबूत राखला आहे. आगामी निवडणुकीला या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मात्र खूपच गर्दी झाली आहे.

२०१४ च्या लोकसभा मतदारसंघात आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा सामना झाला. यात आनंदराव अडसूळ यांनी मैदान राखले. गतवेळी या मतदारसंघात अडसूळ विरुद्ध राणा अशी झालेली लढत हि उमेदवारांच्या आपसात झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. या वेळी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे पती आमदार रवी राणा राष्ट्रवादीकडे आग्रह धरून आहेत. तर डॉ. राजेंद्र गवई यांच्या राष्ट्रवादीतून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीची चर्चा तर सध्या वाऱ्यात विरून चालली आहे.

उद्योजक गुणवंत देवपारे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ असणार आहेत. तर नवनीत राणा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर त्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर डॉ. राजेंद्र गवई हे हि उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात.

२०१४ च्या निवडणुकीचा निकाल
आनंदराव अडसूळ -शिवसेना- ४,६७,२१२ [विजयी]
नवनीत राणा -राष्ट्रवादी – ३,२९,२८०
गुणवंत देवपारे -बसप – ९८,२००
डॉ. राजेंद्र गवई -रिपाइं – ५४,२७८