माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आनंदराव देवकते यांचे निधन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आनंदराव देवकते यांचे निधन झाले आहे. दक्षिण सोलापूरमधून माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आनंदराव देवकते यांनी १९७८ सालापासून २५ वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते.

१९९२-९३ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात पक्षांतर्गत झालेल्या उठावात स्वत: शंकरराव चव्हाणनिष्ठ असूनदेखील देवकते यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. १९९९ ते २००३ या कालावधीत त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही सांभाळले होते. नंतर ‘महानंदा’चे अध्यक्षपदही भूषविले होते.

२००३ साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवकते यांनी शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली होती. नंतर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत देवकते यांना काँग्रेसने संधी दिली असता त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून देवकते यांची राजकीय पिछेहाट होत गेली. २०१४ मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता . त्यांनतर त्यांनी २०१५ मध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.