दारुच्या तस्करीसाठी चक्क खरेदी केली ट्रॅव्हल्स

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – तस्करी करण्यासाठी तस्कर कोणकोणत्या युक्त्या वापरतील याचा नेम नाही. एका तस्कराने दारूची तस्करी करण्यासाठी चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली. या तस्कराला यवतमाळ पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून अटक करुन ट्रॅव्हल्स जप्त केली. ही कारवाई भोसा बायपासवर ट्रॅव्हल्समध्ये दारुच्या बाटल्यांची पोती भरत असताना करण्यात आली. कपिल अरुणराव गजभिये (२७, रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी) असे या तस्कराचे नाव आहे.

रॉयल स्लिपर कोच (एम. एच. ३१-सीबी-९८६) नावाने ही ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करीत होती. काही दिवसापूर्वी शहर पोलिसांनीसुद्धा याच ट्रॅव्हल्ससह दारू घेऊन जाताना पांढरकवडा बायपासवर कपिल गजभिये याला ताब्यात घेतले होते. विशेष पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचून मंगळवारी रात्री भोसा बायपासवर कारवाई केली. यावेळी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत पोत्यात भरलेल्या देशी दारूच्या चार हजार ८०० बॉटल्स् मिळून आल्या. या ट्रॅव्हल्सचा चालक शिवाजी दिनकर देवकते (३८, रा. चिखली ह. मु. जामनकरनगर) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तस्कर आता थेट ट्रॅव्हल्स सारख्या वाहनाचा वापर करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एलसीबीचे प्रमुख प्रदीप सिरस्कर, एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख जमादार सय्यद साजीद, अजय डोळे, अजय ढोले, वासू साठवणे, योगेश डगवार, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे यांनी केली.