राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय राजकारणात ‘केंद्रस्थानी’ ; दिल्लीत चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पुन्हा चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या २४ तासांत नायडू यांनी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा पवार केंद्रस्थानी आल्याची चर्चा दिल्लीत सुरु आहे.

चंद्राबाबू नायडू यांची मोर्चेबांधणी –

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, २३ मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याआधी चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सीपीआय (एम) महासचिव सीताराम येचुरी आणि आपचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तसेच गेल्या आठवड्यात नायडू यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. मागील २४ तासात चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बीएसपी अध्यक्ष मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे तर सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. या सगळ्या राजकीय घडमोडींमध्ये विरोधकांची एकी झाली तर पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचं नावंही पुढं येऊ शकतं अशी चर्चा सुरु झाली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की , ‘अजूनपर्यंत विरोधकांची रणनीती ठरली नाही. निकालांअगोदर विरोधकांची कोणतीही बैठक होणार नाही. विरोधी पक्षातील सर्व नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. चंद्राबाबूंसोबतच्या बैठकीत पंतप्रधान पदाबाबत काहीही चर्चा झाली नाही. आपापल्या राज्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होती .’

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीने विशेष राज्याच्या दर्जावरुन भाजपची साथ सोडली. सध्या ते यूपीएच्या नेत्यांसोबत दिसतात.