अडसूळांविरोधात नाराज शिवसैनिक मातोश्रीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उमेदवारीवरून सुरु असलेले नाराजी नाट्य शिवसेनेत जोर धरत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात नाराज असलेल्या शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर धाव घेतली आहे. अमरावतीमधून त्यांना उमेदवारी देणे काही शिवसैनिकांना रुचलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली असल्याचे समोर येत आहे.

उस्मानाबादमधून रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांना आधीच अडवले. हा वाद शमण्याआधीच आता अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले शिवसैनिक मातोश्रीवर गेले आहेत. परंतु, त्याआधीच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.