शिरूरला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास तत्वत: मान्यता

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन  –  शिरुर तालुक्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता शिरुर तालुक्यासाठी स्वतंञ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास तत्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

शिरूर शहर व शिरूर तालुक्यातील वाढती लोकसंख्या व मोठ्या प्रमाणात होत असलेले औद्योगीकरण याबरोबरच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता शिरूर तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय व्हावे यासाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच सध्याचे उपविभागीय कार्यालय हे दौंड येथे असल्याने अनेक वेळा कामासाठी जाताना नागरिकांचे मोठे हाल होत होते.त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी व अंमलदार यांनाही शिरुर दौंड प्रवास हा अडचणीचा ठरत होता. हीच बाब ओळखून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी मागणी केली होती.या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती आमदार पवार यांनी दिली आहे.

यामुळे शिरूर तालुका व परिसरातील गुन्हेगारीवर वचक बसणार असुन औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारीही कमी होण्यास मदत होणार आहे.