Google Maps च्या ‘ह्या’ तीन फीचरमुळे प्रवास होणार खूपच सोपा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल मॅप्समुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल तर गुगल मॅप्सचा सर्रास वापर केला जातो. आता प्रवास आणखी सहज सुलभ होण्यासाठी गुगल मॅप्सने रियल टाईम बस ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, लाईव्ह ट्रेन स्टेटस, मिक्सड मोड नेव्हिगेशन विद ऑटो रिक्षा रेकोमेंडेशन हे तीन नवे फीचर्स आणले आहेत. बस, रेल्वे आणि रिक्षामधून प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर असणार आहेत.

रियल टाईम बस ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन
गुगल मॅप्सच्या या फीचरच्या मदतीने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्या मार्गावरील ट्रॅफिकची स्थिती समजणार आहे. तसेच हे फीचर सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्या युजर्सना प्रवासासाठी किती वेळ लागेल याची माहिती देणार आहे. प्रवासी हे दुसऱ्या मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असतील तर त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाश्यांना प्रवासासाठी इतर पर्याय यामुळे शोधता येतील. सध्या ह फीचर बंगळुरू, चैन्नई, दिल्ली, हैदराबाद, लखनऊ, मुंबई, मैसूर आणि सूरत या शहरात सुरू केलेले आहे. लवकरच देशातील अन्य महत्त्वाच्या शहरात ही हे फीचर लाँच करण्यात येईल.

लाईव्ह ट्रेन स्टेटस
भारतात सर्वाधिक प्रवास रेल्वेने केला जातो. भारतीय रेल्वे नेटवर्कच्या मदतीने दररोज अनेक प्रवासी ट्रेनने लांबचा प्रवास करत असतात. लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसण्याची सुविधा या फीचरमध्ये देण्यात आली आहे.

मिक्सड मोड नेव्हिगेशन विद ऑटो रिक्षा रेकोमेंडेशन
या फीचरच्या मदतीने कोणत्या ठिकाणी रिक्षा बदलता येतील याची माहिती मिळणार आहे. तसेच तुम्हाला ज्या ठिकाणी जायच असेल त्यासाठी किती खर्च येईल याची देखील माहिती मिळणार आहे. सध्या केवळ दिल्ली आणि बंगळुरू मध्ये हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. लवकरच देशाच्या इतर भागातही ते सुरु करण्यात येईल.