लहान मुलांना अंडी खाण्यास देणं योग्य की अयोग्य ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंडे हे पौष्टिक अन्न आहे. त्यामुळे अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र लहान मुलांना रोज अंड खायला द्यायचं की नाही हा प्रश्न नेहमीच पालकांना पडतो. अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन, कोलेस्ट्रॉल, झिंक, ओमेगा फॅट्स या सर्वांचा समावेश असतो. त्यामुळे लहान बाळापासून मोठ्या मुलांना अंड खायला देणं त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

तज्ञांच्या मते , ६ महिन्यांनंतरच्या बाळाला अंडी खायला देणं फार उत्तम असतं. यामुळे मुलांना भरपूर प्रोटीन आणि अमिनो ॲसिडंही मिळतं. याशिवाय शरीराला आवश्यक असणारं चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील अंड्याच्या सेवानाने वाढते. अंड हा मुलांच्या उत्तम वाढीसाठीचा स्त्रोत आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन्स देखील असतात.

मुख्य म्हणजे अंड्याचा बलक आणि पांढरा भाग दोन्ही मुलांना द्यावं. अंडी हे लहान मुलांना मिळणाऱ्या बेस्ट प्रोटीनचा एक स्त्रोत आहे. अंड्याच्या सेवानामुळे लहान मुलांना प्रोटीन आणि व्हिटॅमीन मिळतं जे मुलांच्या शारिरिक वाढीसाठी महत्त्वाचं आहे.

लहान मुलांना दिवसाला किती अंडी द्यायची हे शक्यतो त्यांच्या वजनावर अवलंबून असतं. १०-१२ किलो वजनांच्या लहान मुलांना दिवसाला जवळपास १५-१८ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. एका अंड्यामध्ये सहा ग्रॅम प्रोटीन असतात. त्यानुसार १० किलो वजनाच्या मुलांना दिवसाला तीन अंडी देणं उत्तम ठरतं.

अंडी खाण्याचे फायदे –

अंडे हे ‘लो सोडियम’ व ‘हाय पोटॅशियम’ असे अन्न आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, पर्यायाने हृदयविकार टाळण्यासाठी अंडय़ाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

अंडय़ातील प्रथिनांमध्ये ‘अमायनो अ‍ॅसिडस्’ असतात. यातील नऊ ‘इसेन्शियल’ अमायनो अ‍ॅसिडस् शरीर तयार करु शकत नाही अशी आहेत. ही अमायनो अ‍ॅसिडस् असलेल्या पदार्थामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. प्रथिनांबरोबरच अंडय़ांमध्ये चरबी, ‘ड’, ‘बी १२’ आणि ‘अ’ जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, सेलेनियम आणि लोह ही खनिजे आहेत.

अंडय़ातील ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोळे व त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोग होतो. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडे व स्नायू बळकट होतात. अंडय़ातील लोह शरीरात चांगले शोषले जाते व त्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या आजारांना प्रतिबंध होतो.