Salute ! तब्बल 16000 फूट उंचीवर डॉक्टरांनी केली जवानाची यशस्वी शस्त्रक्रिया, रचला इतिहास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमधील गोठवणाऱ्या थंडीत तब्बल 16000 फूट उंचीवर एका डॉक्टरांनी जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची घटना समोर आली आहे. अशी माहिती आहे, की पूर्व लडाखमधील (Ladakh) एका सर्जिकल सेंटरमध्ये (Surgical Centre) डॉक्टरांनी एका जवानावर अपेंडिक्सची (Appendix) यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ही शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी इतिहास रचला आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या फॉरवर्ड सर्जिकल सेंटरच्या (Forward Surgical Centre) सर्जिकल टीमनं 16000 फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत अत्यंत कठीण परिस्थितीत अपेंडिक्स काढण्यासाठी एक आपत्कालीन शस्त्रक्रिया केली. गोठवणाऱ्या थंडीसह कठीण परिस्थितीतही डॉक्टरांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेमुळं या जवानाचा जीव वाचला असून संबंधित जवानाची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती आहे.

ही शस्त्रक्रिया एक लेफ्टनंट कर्नल, एक मेजर आणि कॅप्टनसह 3 डॉक्टरांच्या पथकाकडून पार पाडली गेली. लडाखमध्ये असणाऱ्या वातावरणामुळं हेलिकॉप्टरद्वारे या जवानाला तिथून बाहेर काढणं शक्य होत नव्हतं. म्हणून डॉक्टरांच्या पथकाकडून ही शस्त्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. सर्वांनीच डॉक्टरांचं कौतुक केलं.