गोस्वामींच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार ? कधीही अटक होण्याची शक्यता

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई येथून अटक केली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, अलिबाग पोलीस बुधवारी अर्णब यांना अटक करण्यासाठी घरी गेले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णब यांच्यासह त्यांच्या पत्नीने अलिबाग पोलिसांच्या कारवाईस विरोध दर्शवत त्यांना धक्काबुक्की केली होती. त्या प्रकरणी अलिबाग पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आहे. त्याच कारणावरुन त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या फेरतपासणीसाठी अलिबाग पोलीस अर्णब गोस्वामी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहचले. पोलिसांनी त्यांना सहकार्याचे आवाहन केले. काही वेळ अटकनाट्य सुरु होते. अखेर पोलिसांनी अर्णब यांना अटक करुन सकाळी ११ वाजता अलिबागला आणले. दुपारी १२ वाजता गोस्वामी यांना न्यायालयात हजार करण्यात आले.

पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. न्यायदंडाधिकारी सुनैना पिंगळे यांनी गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याची गोस्वामी यांची तक्रार न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.