सोन्याची तस्करी करणाऱ्याला पुणे विमानतळावर अटक, 74 लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुबई वरुन आलेल्या विमानातून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडून 74 लाख 41 हजार रुपयांचे 2196 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास करण्यात आली. पेनकर जुहेर झाहीद (रा. म्हासाला, रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झाहीद हा शनिवारी पहाटे चारच्या सुमारास दुबईहून स्पाईस जेट विमानातून आला. त्यावेळी अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात होती. झाहीद याची तपासणी केली असता त्याच्या जीन्स पँटच्या अंतर्गत खिशामध्ये एका प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पेस्ट स्वरुपातील सोने आढळून आले. तर दुसरी पिशवी त्याने अंतर्वस्त्रामध्ये ठेवली होती. झाहीदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे, पुणे विभागाच्या सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त मोतीलाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमजद शेख, अधिकारी माधव पळनीटकर व प्रतिभा माडवी यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com