भांडणात मध्यस्थी करते म्हणून , सासूला जाळण्याचा जावयाचा प्रयत्न

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन

पतिपत्नीची भांडणे सोडवायला सासू नेहमी मध्यस्थी करते म्हणून जावायाने चक्क सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार येथील साक्रीनाका भागातील ही घटना असून या घटनेत सासूबाई गंभीररीत्या जळाल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, साक्रीनाका भागात राहणाऱ्या सासूबाई कमलाबाई चौधरी यांच्याकडे त्यांची मुलगी आणि जावई दीपक चौधरी राहतात. या दोघा पतिपत्नींमध्ये नेहमीच भांडणे होत होती . या दोघांच्यातील भांडणे सोडवण्यासाठी कमलाबाई चौधरी नेहमी मध्यस्थी करीत होत्या . याचाच राग मनात धरून जावई दीपक चौधरी याने सासूचा बदला घेण्याचा कट रचला दिनांक २४ रोजी दुपारी त्याने घरी ससासूबाई यांना कपाटातून आधारकार्ड काढण्यास सांगितले. आधार कार्ड कपाटातून काढण्यासाठी त्या खाली बसल्या असता त्यांना शिवीगाळ करीत त्यांचा गळा जावयाने दाबला,दुसऱ्या हातातील  पेट्रोलचे कॅन त्यांच्या अंगावर ओतून जाळले . या घटनेत कमलाबाई चौधरी या गंभीर भाजल्या आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत कमलाबाई अशोक चौधरी यांनी फिर्याद दिल्याने दीपक चौधरी यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक के.जी. पवार व पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाटील करीत आहेत.