अभिनेताही गोंधळला असेल की मोदी माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात : ओवेसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अँकरला त्यांच्यासारखा अभिनय जमला नसता म्हणून मोदी खऱ्या अभिनेत्याला घेऊन आले. पण अभिनेताही गोंधळला असेल की मोदी तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात. अशी टीका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली. अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

येत्या २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहेमदुल्ला यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. टीव्हीवर मुलाखत झाली मित्रों की, अँकर त्यांच्यासारखा अभिनय करु शकत नव्हते. मग मोदी खऱ्या अभिनेत्याला घेऊन आले. घरात बसून मुलाखत दिली. मागे मोर ओरडत होते. मोदी म्हणतात मी झोपत नाही. मला झोप येत नाही. मी साडेचार तास झोपतो. पण झोप येत नाही कारण घरात कोणीही नाही. असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, तुम्ही एकटे राहता, तर झोप कशी येईल? मोदीजी झोपून जा आता. आता तुमच्या झोपण्याचे दिवस आले आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला.

याचबरोबर, मोदी सर्वात मोठे अभिनेते आहे असं वाटत होते. त्यामुळे अभिनेताही गोंधळला की, अरे मला तर अभिनय करण्यासाठी पैसे मिळतात आणि हे तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात. ते बोलतात की चार तास झोपतो, मग आमच्यावर उपकार करता का? अशी टीकाही त्यांनी केली.