नागपुरात आशीष देशमुखांचा उमेदवारीसाठी दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी आमदार आशीष देशमुख यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून दावा केला आहे. नागपूर शहर काँग्रेस समितीकडे आशीष देशमुखांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

आशीष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोल मतदारसंघात निवडणून आले होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत. भाजप आमदार असताना त्यांनी सरकारविरोधातच बंड पुकारले होते. सरकारवर सडेतोड टीका केली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते. स्वतंत्र विदर्भ, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानाचे पत्र पाठविले होते. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. अशा एक दोन वादांनंतर आशीष देशमुख यांनी गेल्या 2 ऑक्‍टोबरला वर्धा येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. त्यांचा राजीनामा 6 ऑक्‍टोबरला मंजूरही झाला. तेव्हापासून त्यांनी नागपूर, वर्धा आणि अकोला या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी करत होते.

दरम्यान, काँग्रेस प्रदेश समितीने इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज देण्यासाठी सांगितलं होते. त्यावर आशीष देशमुखांनी नागपूर मतदारसंघासाठी अर्ज भरला आहे. नागपूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.