‘तुम्ही महाराष्ट्राची मान उंचावली’, आशिष शेलारांकडून तेजस उध्दव ठाकरेंचे कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी भाजप नेते आशिष शेलार यांनी सोडली नाही. मात्र आता आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचे विशेष कौतुक केले आहे. तेजस ठाकरे यांचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, अशा शब्दांत त्यांनी तेजस यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

जीवन सृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले.. त्या अज्ञात अविष्काराचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी हिरण्यकेशी प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे ! ग्रेट ! अशा शब्दात शेलार यांनी तेजस ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

सामना या वृत्तपत्रातील बातमी शेअर करत ट्विटरवरून शेलार यांनी तेजस यांचे कौतुक केले आहे. शेलार म्हणाले, जीवन सृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उद्धव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी हिरण्यकेशी प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे मान कार्य आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे नेहमी दुर्मीळ वन्यजीवांवर संशोधन करत असतात. आता तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. आंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणारी माशाची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे. या माशाची ही 20 वी प्रजाती आहे. तर तेजस यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे.

यापूर्वी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पालींच्या दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या होत्या. तेजस ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती. आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलं आहे. याचा संस्कृत अर्थ सोनेरी रांगाचे केस असणारा असा आहे. माशाच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रविणराज जयसिन्हा यांचे सहकार्य मिळालं.