“अशोक चव्हाणांसह ३० टक्के काँग्रेस नेत्यांचे सनातनशी संबंध”

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकणांचे रणशिंग फुंकले आहे. रॅली आणि प्रचार सभांना वेग आला आहे. अशातच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांचा सिलसिला देखील सुरु आहे. आता काँग्रेसचे ३० टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नाव देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडुन घेण्यात आले.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘भाजपकडून अनेक आरोप होत असताना त्यावर राहुल गांधींनी मौन बाळगल्याने त्यांच्याबाबत संशय बळावला आहे. यामुळेच आम्ही काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात घराणेशाही सुरू असून केंद्रातील मोदी सरकार संस्कृती नसलेले आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध काम करणारे सरकार आहे ‘असे आंबेडकर म्हणाले.

बारामतीकरांवर टीका

या सभेदरम्यान बोलताना डॉ प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. डॉन दाऊद इब्राहीमचे नाव घेतलं की बारामतीकरांना का झोंबतं. मुंबई बॉम्बस्फोटामागं केवळ पाकिस्तानी नाही तर इथले राजकारणीही जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाला जनता वैतागली असून आता सर्व सूज्ञ झाले असल्याचं आंबेडकर यांनी म्हटले.

दरम्यान, यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातनशी संबंध असल्याची चर्चा होती. एका कार्यक्रमातील त्यांचा फोटो प्रसिद्ध झाल्याने ही चर्चा झाली होती. दरम्यान, त्यावेळी सनातन संस्थेने त्याचे एक छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. तर बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी सबंध नसल्याचा खुलासा काँग्रेसने खुलासा केला होता.