Coronavirus बाबत चीनचा ‘डेटा’ झाला ‘लीक’, Covid-19 रुग्णांची संख्या हजार नाही तर लाखात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीबाबत चीनने आतापर्यंत दावा केला आहे की येथे केवळ ८४,०२९ रुग्णांची नोंद झाली, तर ४,६३३ मृत्यू झाले आहेत. पण आता एक ताजा खुलासा झाला असून त्यात म्हटले गेले आहे की, चीनमध्ये ८४ हजार नाही तर ६.४ लाख लोक कोरोना संक्रमित आढळले होते. लष्कराच्या नेतृत्वात चालवलेल्या चिनी विद्यापीठातून ही माहिती उघडकीस आली आहे.

चांगसा येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या डेटा लीकवरून हा खुलासा झाला आहे. या डेटामध्ये असेही समोर आले आहे की संक्रमणाच्या विळख्यात २३० शहरे होती. यात फेब्रुवारीपासून एप्रिल अखेरपर्यंत संक्रमित लोकांची यादी आहे. मात्र, संक्रमित रूग्णांच्या अचूक संख्येसह त्यांच्या भेटीच्या ठिकाणावरील जीपीएस कोडिंगची देखील नोंद आहे.

लीक झालेल्या डेटामध्ये रुग्णालयांसह संक्रमित सापडणारे ठिकाण जसे हॉटेल्स, सुपरमार्केट, रेल्वे स्थानक, रेस्टॉरंट्स आणि शाळा यांचीही नावे आहेत. उदाहरणार्थ यात लिहिले आहे की, १४ मार्च रोजी प्रकरण पूर्वेकडील शहर शिनजियांगमधील एका रेस्टॉरंटमध्ये कोविड-१९ चे प्रकरण सापडले, तर हार्बिनमधील चर्चमध्ये १७ मार्च रोजी संक्रमितांची दोन प्रकरणे आढळली.

ही संख्या ६.४ लाखांपेक्षा जास्त आणि कमी असू शकते असाही दावा केला जात आहे. हा डेटा कसा गोळा केला हे स्पष्ट नाही, परंतु विद्यापीठाच्या साइटवर असे लिहिले आहे की त्यांनी विविध सार्वजनिक संसाधने वापरली आहेत. या प्रकरणात कोणाचेही नाव नसल्याने या केसची पुष्टी करणे अवघड आहे.

चीनवर कोरोना रूग्णांची संख्या लपवल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, चीनचा दावा आहे की ते कोरोना विषाणूचा सामना करण्यास यशस्वी झाले आणि संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक पीपीआय किट्स आणि औषधे वेळेत खरेदी केली.

कोरोना विषाणूचा सामना करण्यात चीनच्या सैन्याची मोठी भूमिका आहे. सैन्याने क्वारंटाईन सेंटर, वाहतूक पुरवठा आणि रुग्णांना बरे होण्यासाठी खूप मदत केली आहे. अशा परिस्थितीत चिनी सैन्य अधिकार्‍यांकडून वापरण्यात येत असलेला डेटा बर्‍यापैकी विश्वसनीय असल्याचे म्हटले जाऊ शकते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, त्यांना अशा कोणत्याही डेटाबेसची माहिती नाही.