आणखी एका मित्रपक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी ‘हात’मिळवणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्र पक्षांची संख्या काही दिवसापासून कमी होताना दिसत आहे. शिवसेना अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेच पण त्या पाटोपाठ आता एन निवडणुकीच्या तोंडावर आसाममधील बोडोलँड पीपल्स फ्रंटनं एनडीएतून बाहेर पडत काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे.

आसाममधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. तीन टप्प्यात येथे निवडणूक होणार असून येथे २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होईल. निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. गेल्या ५ वर्षांपासून भाजपसोबत सत्तेत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटनं (BPF) काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीशी हातमिळवणी केली. भाजपची बीपीएफनं साथ सोडल्याचा फटका सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत बसू शकतो.

बोडोलँड पट्ट्यात बीपीएफचं प्राबल्य आहे. हा पक्ष २००६ पासून या पट्ट्यातल्या १२ पैकी १२ जागा जिंकत आला आहे. आता हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीत सामील होत आहे यासंदर्भात ट्विटरवर पक्षाचे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, शांतता, एकता आणि विकासासाठी काम करण्यासाठी बीपीएफनं आगामी विधानसभा निवडणुकीत महाजाथशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत आता आमची मैत्री किंवा युती राहिलेली नाही, असं मोहिलारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बोडोलँड टेरिटोरियल काऊन्सिलच्या निवडणुकीत भाजपनं बीपीएफला सोबत घेतलं नाही. त्या निवडणुकीत बीपीएफला १७, भाजपला ९ तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला (यूपीपीएल) १२ जागा मिळाल्या. या निवडणुकीवरून भाजप आणि बीपीएफ यांचे संबंध बिघडले होते.

काँग्रेसप्रणित महाआघाडीचा विस्तार
बीपीएफनं भाजपची साथ सोडल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा विस्तार झाला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीत बीपीएफसोबतच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचाही (राजद) समावेश झाला आहे. आधीपासून एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम (एम-एल) आणि आंचलिक गण मोर्चा (एजीएम) हे पक्ष काँग्रेसप्रणित आघाडीत आहेत.