बेकायदा नोंदीप्रकरणी तलाठी, नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात बारा वर न करता दुसऱ्याने हरकत घेतल्याचे दर्शवून परस्पर दुसऱ्याच्या नावावर जमीन केली. तसेच त्याविरुद्ध केलेल्या अपिलावर तब्बल १३ वर्षे जाणीवपूर्वक निर्णय न करणाऱ्या तलाठी व नायब तहसीलदार यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

हिंजवडी पोलिसांनी यशवंत बापू सावंत (रा. सावंत व्हिला, भोईर कॉलनी, चिंचवड), तत्कालीन तलाठी स. न. खिरीड आणि तत्कालीन नायब तहसिलदार एन. बी. धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९९७ पासून सुरु असल्याचे शशिकांत विश्वानाथ भोसले (वय ५३, रा. संस्कार सहकारी संस्था, गोल्फ क्लब रोड, येरवडा) यांनी हिजंवडी पोलिसांकडे केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शशिकांत भोसले यांनी हिंजवडी येथील ६. ७५ गुंठे जमीन खरेदी केली. त्यांची सात बारा च्या उताऱ्यावर नोंद घेण्याचे आदेश तत्कालीन पौडचे तहसिलदार यांनी दिले होते.

भोसले हे अनुसुचित जातीचे असल्याने भोसले यांनी खरेदी केलेल्या जमिनीची तत्कालीन तलाठी खिरीड यांच्या नावे सात बारा उतारा नोंद न घेता राहुल वाघमारे यांनी हरकत घेतली असल्याचे दर्शविले. वाघमारे यांच्या पूर्वीच्या अर्जामध्ये खाडाखोड करुन त्याचा आधार घेऊन तत्कालिन पौडचे नायब तहसिलदार धनगर यांनी चौकशी करुन भोसले यांचे काही एक न ऐकता यशवंत बापू सावंत यांच्या बाजूने निर्णय दिला.

भोसले यांनी खरेदी केलेली जमीन ही गैरमार्गाने सावंत यांच्या नावावर हस्तांतरित करुन फसवणूक केली. तसेच त्यांनी दिलेल्या निर्णयावर अपील केले असताना गेली १३ वर्षांपासून त्या अपिलावर निर्णय दिला नाही. त्यामुळे आपण अनुसुचित जमातीचे असल्यानेच आपल्याला अशी वागणूक दिल्याचे भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –