धक्कादायक ! ‘ऑन डयुटी’ असलेल्या पोलिसाच्या अंगावर घातली गाडी, टवाळखोरांमुळं कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे, याअंतर्गत मंगळवारी रात्रीपासूनच वसई पूर्वेस गोखीवरे नाक्यावर (वाकणपाडा) येथे नाकाबंदी सुरु होती. या दरम्यान ऑन ड्यूटी असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर काही मुजोर तरुणांनी दुचाकी चढवून जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी वसई पूर्वेस घडला. परंतु हे मुजोर तरुण घटनास्थळावून पळून जाण्यात यशस्वी ठरले.

सुनील पाटील असे जखमी पोलीस उपनिरिक्षकाचे नाव असून ते वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी रात्री 12 वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सुनील पाटील यांची ड्युटी गोखीवरे वाकणपाडा येथे लावण्यात आली होती. त्यामुळे 25 मार्चला बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास काही मुजोर तरुण त्याभागात दुचाकीवरुन फिरत होते, यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले आणि त्यांना जागीच थांबण्याचा इशारा केला. परंतु असे असताना सर्वजण पळू लागले. यावेळी या सर्वांना पकडताना पोलीस उपनिरिक्षक सुनील पाटील थेट एका मुजोर तरुणाच्या दुचाकीसमोर रस्त्यावर उभे राहिले त्यावेळी एका माथेफिरु तरुणाने पाटील यांच्या अंगावर दुचाकी घातली, त्यामुळे ते पुढे फरफटत गेले, जीवे मारण्याचा प्रयत्न करुन तो दुचाकीस्वार अन्य साथीदारांसह पसार झाला.

या तरुणांना वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहलाद राकेश राजभर (वय 22) राहणार नालासोपारा पूर्व, वाकणपाडा या माथेफिरुला अटक करण्यात आली आहे असे पालघर पोलीस जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत, त्यासाठी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे परंतु असे असताना देखील काही मुजोर तरुण गाड्यांसह रस्त्यावर उतरत आहेत किंवा एखाद्या ठिकाणी जमा होत आहेत. त्यांना कालपासून पोलिसांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली आहे.