धक्कादायक ! ‘कोरोना’बाधिताला भेटू न दिल्यानं ठाण्यात डॉक्टरवर हल्ला

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाबाधित रुग्णाला भेटण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना घडली. घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात ही घटना घडली असून  कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करीम अब्दुल कादर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टर, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी प्रयत्न करीत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले कायम होत आहेत. भाईंदरपाडा परिसरात ठाणे महापालिकेचे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी या केंद्रातील रुग्णाला भेटण्यासाठी करीम तेथे आला होता. मात्र, संसर्गाच्या भीतीने तेथील एका डॉक्टरने करीमला रोखले. या कारणावरून दोघांत वाद झाला. त्यानंतर करीमने त्या डॉक्टरला शिवीगाळ करीत मारहाण केली.