माजी आमदार आणि मनसेचे नेते हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपखाली त्यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन दाभाडे यांनी क्रांतीनगर सिग्नलवर पानटपरी टाकून त्याच्यावर निळा झेंडा लावला होता. पानटपरी न काढल्यास ठार मारण्याची धमकी दिली व जातीवाचक शिवीगाळ जाधव यांनी केली. या प्रकरणी नितीन रतन दाभाडे (वय ३० रा. बनेवाडी) यांनी तक्रार दाखल केली.

अदालत रोडवरील क्रांतीनगर सिग्नलवर शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. असं नितीन रतन दाभाडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर दाभाडे यांच्या तक्रारीवरून अ‍ॅट्रॉसिटी अॅक्ट आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तपासणी छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत हे करत आहेत.