बाबरी मशिदीच्या अवशेषाची मागणी करणार मुस्लिम पक्ष, सुप्रीम कोर्टात याचिका करणार दाखल

अयोध्या : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम जन्मभूमीचे प्रकरण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाणार आहे. बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटीने बाबरी मशीदीच्या अवशेषांवर दावा केला असून त्यासाठी पुढील आठवड्यात कमिटीने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राम जन्मभूमी – बाबरी मशीदीच्या वादग्रस्त जागेवरून बाबरी मशीदीचे अवशेष हटवावेत असे मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे.

बाबरी मशीदीच्या अवशेषांवर दावा करण्याबाबत आम्ही आमचे वकील राजीव धवन यांच्याशी चर्चा केली असून या अवशेषावर दावा केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे असल्याचे बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे. पुढील आठवड्यात बैठक घेऊन ही प्रक्रिया पुढे नेऊ असेही जिलानी यांनी सांगितले. बाबरी मशीदीचे अवशेष ठेवण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मला अयोध्येतील लोकांनी दिल्याचेही जिलानी म्हणाले.

अयोध्या प्रकरणी आपल्या पक्षकारांमार्फत आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बाबरी मशीद सेलचे अध्यक्ष एस.क्यू.आर. इलियास यांनी म्हटले आहे. मंदिर निर्मितीचे काम सुरु होण्यापूर्वी वादग्रस्त स्थळावरून मशीदीचे अवशेष हटवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. अयोध्येतील प्रसिद्ध मौलवी सैयद एखलाख यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बाबरी मशीदीचे अवशेष ठेवण्यासाठी योग्य जागेची पाहणी आम्ही केली असून त्या ठिकाणी हे अवशेष ठेवले जाऊ शकतात असे एकलाख म्हणाले.