आता आयुर्वेदिक औषधे एफडीएच्या कक्षेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांवर उत्तम उपाय म्हणून आयुर्वेदिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. मात्र अनेक कंपन्या आयुर्वेदिक औषधांच्या नावावर कोणत्याही औषधांची विक्री करतात त्यामुळे आता आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीकरिता अन्न व औषध प्रशासनाचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती एका वृत्तसमूहाने दिली आहे. राज्यात आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी आस्थापना कायद्यातंर्गत परवाना घेतला जातो. मात्र, या उत्पादनांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने काही आयुर्वेदिक औषधे ताब्यात घेतली आहेत या औषधांमध्ये अ‍ॅलोपथी औषधांचे गुणधर्म आढळून आले आहेत. यात लैंगिक शक्ती वाढवण्याचा दावा करणाऱ्या औषधांमध्ये तसेच विविध हाडांच्या दुखण्यासाठी वा मसाज करण्यासाठी वापरात येणाऱ्या तेलांमध्ये अ‍ॅलोपथी औषधांचा वापर करण्यात आल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. वजन वाढवण्यासाठी, केसगळती थांबवण्यासाठी तसेच हाडांच्या बळकटीसाठी घेण्यात येणाऱ्या काही आयुर्वेदिक औषधांमध्ये स्टिरॉइडची मात्रा अधिक असते, असे अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

खरेतर शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही या एका USP वर आयुर्वेदिक औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या भ्रमात राहूनच लोक या औषधांचे सेवन करतात मात्र या औषधांमध्ये आयुर्वेदाशिवाय इतर घटक असले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे प्रकार टाळण्यासाठी या औषधांच्या विक्रीसाठीही एफडीएचा परवाना बंधनकारक करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडे विचारणा करण्यात आली आहे.