Babri Masjid Case : सगळे निर्दोष तर मग बाबरी मशीद जादूनं पडली का ? असदुद्दीन ओवेसींकडून अनेक प्रश्न

पोलीसनामा ऑनलाइन – बाबरी मशीद (Babri Masjid ) विध्वंस प्रकरणी लखनऊ तील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्याची घटना पूर्वनियोजित कट नव्हता, असे निरीक्षण नोंदवत न्यायालायने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या निकालानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबरी प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, मग बाबरी कोणी तोडली. ती जादून पडली का ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सीबीआय न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ओवेसी यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले, ‘कोणीच दोषी नसेल तर मग बाबरी मशीद जादून पडली का ? मशिदीत जादूने मूर्ती ठेवण्यात आल्या का ? मशीदीचं कुलूप जादूने उघडण्यात आलं का ?,’ असे प्रश्न त्यांनी विचारले. तसेच ‘लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. तेव्हा हिंसाचार उसळला. जाळपोळ झाली. घरे पेटवून देण्यात आली. कुटुंब उध्वस्त झाली. एक धक्का ओर दो, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या. मशीद पडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय फायद्यासाठी मशीद पाडली. पुढे त्यातूनच त्यांना सत्ता प्राप्त झाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,’ असे ओवेसी यांनी म्हटलं.

भाजपच्या नेत्यांनी बाबरी पाडताना चिथावणीखोर वक्तव्य केल्याचं संपूर्ण जगाने पाहिल्याचं म्हणत, ओवेसींनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला. ‘बाबरी मशीद पाडण्यासाठी कट रचला. मशीद पाडली जाईपर्यंत तुम्ही राजीनामा देऊ नका, असे आडवाणी यांनी कल्याणसिंह यांना सांगितलेलं. पुढे हेच कल्याणसिंह राज्यपाल झाले. आडवाणी उपपंतप्रधान, उमा भारती केंद्रीय मंत्री झाल्या. बाबरी पाडल्याने या सर्व नेत्यांची राजकीय कारकीर्द उभारली,’ असे सुद्धा ओवेसी म्हणाले.