UP : बलियामध्ये पत्रकाराची गोळी घालून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यामध्ये सोमवारी एका पत्रकाराची गोळी घालून हत्या करण्यात आली. हे हत्याकांड बलिया जिल्ह्यातील फेफना पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी रात्री घडलं. माहितीनुसार, मृत पत्रकार रतन सिंह एका खाजगी टीव्ही चॅने मध्ये काम करत होता. सोमवारी रात्री उशिरा रतन सिंहची गोळी घालून हत्या करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच, त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. घटनेनंतर थोड्याच वेळात पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहचली आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. ही घटना फेफना गावच्या सरपंचाच्या घराजवळ घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वैयक्तिक वादातून ही घटना घडली असून, हल्ला करणारा रतन सिंहच्या परिचयातील असल्याचं सांगितलं जातंय.

घटनास्थळी एसपी सह अनेक अधिकारी गेले होते. बलियाचे एसपी देवेंद्रनाथ यांनी सांगितलं, किरकोळ वाद सुरु असताना हल्लेखोरांनी रतन सिंह यांची गोळी घालून हत्या केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत. संपत्तीच्या कारणावरून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी जौनपूर मध्ये झालं होतं तिहेरी हत्याकांड

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात जमिनीच्या वादावरून रविवारी हे तिहेरी हत्याकांड घडून आलं होतं. ही घटना खुटहन तालुक्यात असणाऱ्या फिरोजपुर गावतील आहे. 15 एकर जमिनीवरून दोन गटात झालेल्या वादात 3 जणांची हत्या झाली.