क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! भारत-द. आफ्रिका वनडे मालिका पुन्हा होणार : BCCI

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरातील साथीच्या कोरोना व्हायरसने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला आहे. ज्यामुळे आयपीएलची तारीख आधीच पुढे गेली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका देखील एका सामन्यानंतर रद्द करण्यात आली आहे. परंतु ही मालिका रद्द झाल्याने निराश झालेल्या क्रीडा रसिकांसाठी चांगली बातमी आहे. कारण ही मालिका पुन्हा होणार असल्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी (सीएसए) चर्चा सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. दोन्ही संघांमधील १२ मार्च रोजी पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ आणि १८ रोजी एकदिवसीय सामने होणार होते, जे आता रद्द करण्यात आले आहेत. हे दोन्ही सामने लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणार होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान बाकी दोन एकदिवसीय सामने होणार नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. त्यांनतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची मालिका पुन्हा होऊ शकते, असे बीसीसीआयनेही स्पष्ट केले आहे. मंडळाने एक निवेदन जारी करत म्हंटले की, ‘दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ही मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकात चर्चा करणार आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा कहर भारतासह संपूर्ण जगात सुरू आहे. डब्ल्यूएचओने त्याला साथीचा रोग म्हणून जाहीर केला आहे. याची खबरदारी म्हणून भारत सरकारने परदेशी लोकांना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर, क्रीडा मंत्रालयाने सर्व क्रीडा महासंघांना सांगितले की, कोणताही खेळ टाळता येणार नाही तर तो बंद दाराच्या दरम्यान आयोजित केला जावा.