धक्‍कादायक ! गटविकास अधिकार्‍यानं पं.स. कार्यालयात ‘गोमूत्र’ शिंपडलं, ‘अजब’ कारनामा केल्यानं ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूरग्रस्त भागात प्रतिनियुक्तीवर काही दिवसांसाठी कामावर पाठविण्यात आलेल्या एका गटविकास अधिकार्‍याने परत आल्यावर स्वतःच्या पंचायत समितीमधील कार्यालयाची साफसफाई करून ते गोमूत्राने पवित्र केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकाराने जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली असून, अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी-अभियंते यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) पाठवण्यात आले होते. त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा पदभार अतिरिक्त गटविकास अधिकार्‍यांकडे देण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करताना, तसेच माझ्या कार्यालयात अन्य कोणी खुर्चीवर बसू नये, अशी सक्त ताकीद दिली होती.

या प्रकरणी संबंधित अतिरिक्त गटविकास अधिकार्‍याने जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली. तेव्हा सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना पदभार घेण्यास, तसेच सर्व अधिकारांसह कामकाज करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी कामकाज केले. ते करीत असताना वारंवार अडथळे निर्माण केले. एवढेच नव्हे तर या अधिकार्‍यांना गाडी मिळू नये म्हणून हे गटविकास अधिकारी कार्यालयीन गाडी घेऊन कोल्हापूर, सांगलीमध्ये गेले.

विभागीय आयुक्तांनी ज्या अधिकार्‍यांच्या नेमणुका पूरग्रस्त भागात केल्या होत्या, त्यांना येथून स्वतःची वाहने घेऊन जाण्यास परवानगी दिली नव्हती. तरीदेखील पुरंदरचे गटविकास अधिकारी कार्यालयीन गाडी चालकासह घेऊन गेले. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी (15 ऑगस्ट) हे गटविकास अधिकारी सांगली, कोल्हापूरातून परस्पर पंचायत समितीमध्ये आले. कार्यक्रमासाठी असलेल्या बँड पथकाद्वारे स्वतःची मिरवणूक काढण्याचा प्रकार घडला. त्यानंतर ते पुन्हा पूरग्रस्त भागात गेले. तेथून कार्यमुक्त झाल्यावर पंचायत समितीमध्ये आल्यावर त्यांनी कर्मचार्‍यामार्फत कार्यालयाची संपूर्ण साफसफाई करून घेतली, तसेच गोमूत्र शिंपडून घेण्यात आले आणि त्यानंतरच कामकाजाला सुरुवात केली.

दरम्यान, या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. आता प्रशासनाने माहिती घेण्यास सुरुवात केली असून, या वादग्रस्त अधिकार्‍याची खातेनिहाय चौकशी होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –