एसटी बसमधून प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं, औरंगाबादमध्ये 10 जण निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनलॉकनंतर आता राज्यात एसटी वाहतूक सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी एसटी बसला कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, औरंगाबादेत एसटी बसने दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर जवळपास 261 प्रवासी दाखल झाले होते. या सर्व प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये 10 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून अँटिजन चाचणी घेण्यात येते. आता एसटी बस सेवा सुरू झाल्यानंतर स्थानकावर चाचणी घेण्यात येत आहे. काल संध्याकाळपर्यंत आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यात 261 प्रवाशांची चाचणी घेण्यात आली होती, यात 10 जण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. जे प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाउनमुळे तब्बल 5 महिने एसटी बससेवा बंद होती. अखेर 20 ऑगस्टपासून जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.