‘या’ कारणावरून डोंबिवलीत तरुणाचा खून

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –  डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमध्ये शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या सशस्त्र हाणामारीत एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर मेहुणा-भावोजी असे दोघेजण जखमी झाले आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सशस्त्र हल्ल्यात शिवाजी वामन खंडागळे (वय २५) हा ठार झाला, तर संतोष विलास लष्करे (वय ३४) हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत राजू शिवराम धोत्रे (वय २९) याच्या फिर्यादीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १२ तासाच्या आत महेश दिलीप गुंजाळ (वय २२), निखिल सुरेश माने (वय २३), जयेश अशोक जुवळे (वय २२), आशिष अनिल वाल्मिकी (वय २२) आणि श्रीनिवास बसप्पा सुगला (वय२३) रा. दत्तनगर या सर्व मारेकऱ्यांना अटक केली आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संतोष लष्करे याच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यावेळी मेहुणा राजू धोत्रे आणि त्याचा मित्र शिवाजी खंडागळे हे दत्तनगरमध्ये राहत असलेल्या लष्करे याच्या घरी गेले. तेथे दारू पार्टी करण्यात आली. तेव्हा राजू धोत्रे, संतोष लष्करे आणि शिवाजी खंडागळे यांच्यात गप्पा सुरु असताना, संतोष लष्करे याने मेहुणा राजू धोत्रे याला पाच महिन्यापूर्वी महेश गुंजाळ याने आपणास शिवीगाळ केल्याचं म्हटले. नंतर राजू धोत्रे, संतोष लष्कर आणि शिवाजी खंडागळे विनाहत्यार तिघे महेश गुंजाळ याला जाब विचारण्यासाठी गेल्यावर ‘तू मला फोनवर शिवीगाळ का केली?’ असा महेश गुंजाळला जाब विचारला.

वातावरण तापल्यावर महेश गुंजाळ आणि त्याच्या साथीदाराने स्टंप आणि तलवारीने हल्ला चढवला. त्यात राजुचा मित्र शिवाजी खंडागळे याच्यावर महेश गुंजाळ व निखिल माने या दोघांनी डोक्यावर मिळून लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात वर्मी घाव लागल्याने शिवाजी खंडागळे हा जागीच ठार झाला. त्यानंतर पाचही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू धोत्रे व त्याचा भावोजी संतोष लष्करे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी घटनास्थळी जात शिवाजी खंडागळे याचा मृतदेह पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, राजू धोत्रे याच्या जबानीवरुन महेश गुंजाळ व त्याच्या साथीदारांवर भादंवि कलम ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. व पो. नि सुरेश आहेर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १२ तासातच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे अद्याप सापडलेली नाहीत.