दारूच्या नशेत आईला शिवीगाळ केल्याचा मुलाला आला राग; कोयत्याने सपासप वार करून वडिलांचा खून

बीड : पोलीसनामा ऑनलाइन : सतत दारू पिऊन घरात येणे आणि आईला शिवीगाळ करून वाद घालणे असे करणाऱ्या वडिलांचा मुलाला राग आला. त्यानंतर शिवीगाळ करणारे वडील शेतात एकटे असल्याचे पाहुन मुलाने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात घडली.

किसन अंबादास तागड (वय-60) असे यामध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पिंपळनेर परिसरातील रहिवासी होते. किसन हे दारूच्या नशेत घरात नेहमी वाद घालत असायचे. ते त्यांच्या पत्नीला शिवीगाळही करायचे. हे सातत्याने चालत असायचे. त्यामुळे कुटुंबही चांगलेच कंटाळले होते. त्यानंतर संतप्त झालेला त्यांचा मुलगा लहू किसन तागड याने वडिलांना ठार मारायचे ठरवले. त्यानुसार किसन हे मंगळवारी शेतात एकटे होते. हे लहू याला समजले होते. त्यानंतर त्याने कोयत्याने सपासप वार करून वडिलांचा खून केला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. किसन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

आरोपी ताब्यात

लहू याने त्याच्या वडिलांची हत्या केल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यादरम्यान किसन यांचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.